पुणे, दि. २४ मे २०२५: मावळ तालुक्यातील उर्से गावात जमिनीच्या मालकी हक्कावरून एका महिलेला तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी निर्दयपणे मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २१ मे २०२५ रोजी दुपारी चारच्या सुमारास मौजे उर्से येथील गट नं. ४८२ मध्ये असलेल्या तिच्या स्वर्गवासी पती शंकर रसाळ यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर गेली होती. याच वेळी आरोपी संतोष तुकाराम रसाळ (वय ४० वर्षे), माख्ती तुकाराम रसाळ (वय ४५ वर्षे) आणि इतर दोन महिला आरोपी (वय ३५ आणि ४२ वर्षे), जे सर्व फिर्यादीचे दीर आणि जावा आहेत, यांनी तिला घेरले आणि जुन्या जमिनीच्या वादातून मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपी संतोष आणि माख्ती यांनी महिलेला लाकडी दांडक्याने पाठीवर, खांद्यावर, हातावर आणि पायांवर जबर मारहाण केली, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यातील एका महिला आरोपीने फिर्यादीचे केस पकडून तिला खाली जमिनीवर पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दुसरी महिला आरोपी आणि मोठा दीर माख्ती यांनीही तिला हाताने मारहाण करत, "काय व्हायचे ते एकदाच होऊ दे, हिला चांगली ठोका" अशा शब्दांत धमकी दिली आणि शिवीगाळ केली.
या अमानुष मारहाणीनंतर फिर्यादी महिलेने शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस नाईक परदेशी या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #Maval #LandDispute #Assault #DomesticViolence #ShirgaonPolice #IndianJusticeCode #PoliceInvestigation #MaharashtraNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा