रविवार, १८ मे, २०२५

बांगलादेशच्या ‘या’ वस्तूंच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध

 


आयात-निर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी DGFT चा निर्णय

मुंबई, १७ मे २०२५: केंद्र सरकारने बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या काही विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर निर्बंध लादले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार, बांगलादेशातून तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि काही अन्य वस्तूंवर आता विशिष्ट बंदरांमधूनच आयात करण्याची परवानगी असेल. मात्र, भारतामार्गे भूतान आणि नेपाळकडे जाणार्‍या बांगलादेशच्या वस्तूंना हे निर्बंध लागू होणार नाहीत.

DGFT ने १७ मे २०२५ रोजी अधिसूचना क्रमांक 07/2025-26 जारी करून हे निर्बंध तातडीने लागू केले आहेत. मुख्य निर्बंध खालीलप्रमाणे:

  • तयार कपड्यांची आयात देशातील कोणत्याही भूमी बंदरातून करता येणार नाही. ती फक्त न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांतूनच करता येईल.
  • आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील कोणत्याही भूमी सीमा शुल्क ठाणी/एकात्मिक तपास चौक्या आणि पश्चिम बंगालमधील चांग्राबांधा आणि फुलबारी भूमी सीमा शुल्क ठाणी मार्गे काही वस्तू आयात करता येणार नाहीत. यामध्ये फळे/फळांच्या चवीची व कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कापूस आणि सूत धाग्याचे अवशेष, प्लास्टिक आणि तयार पीव्हीसी वस्तू (ठराविक पिगमेंट्स, रंगद्रव्ये, प्लास्टिसायझर्स आणि ग्रॅन्युल्स वगळून) आणि लाकडी फर्निचर यांचा समावेश आहे.
  • बांगलादेशमधून मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि खडी यांच्या आयातीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

या अधिसूचनेचा उद्देश आयात-निर्यात प्रक्रिया सुलभ करणे आणि काही विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर लक्ष ठेवणे हा आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाच्या https://dgft.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

#India #Bangladesh #Trade #Import #Export

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा