आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे:अण्णा बनसोडे

 


पूर बाधितांना शासनाची मदत वेळेत देण्याची खबरदारी घ्यावी, आपत्कालीन व्यवस्थापनाचा घेतला आढावा

पिंपरी, दि. २३ मे २०२५: पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज बैठक घेतली. महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीत महापालिका, पोलीस, पाटबंधारे, महावितरण, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. डी. आव्हाड, उपायुक्त बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार जयराज देशमुख, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, “लोकहितासाठी शासन काम करत असते. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी. सध्या बेमोसमी पाऊस सुरू आहे आणि लवकरच पावसाळा सुरू होईल. वारंवार पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणांची पाहणी प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे करावी आणि आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. नदीकाठच्या रहिवासी भागात पुराचा धोका असतो, तसेच काही ठिकाणी नाल्यांमधील पाणी घरात शिरते. अशावेळी प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थिती नियंत्रणात आणावी. आवश्यक ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा आणि गरज भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे. निवारा केंद्रांवर नागरिकांना भोजन, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक सुविधा द्याव्यात.”

नागरिकांना विश्वासात घेऊन आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा तैनात ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. पिंपरीतील काही भागांमध्ये नागरिकांना वारंवार पुराचा सामना करावा लागतो, त्यामुळे तिथे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रस्त्यांवरील चिखल तातडीने साफ करणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, झाडपडीच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देणे आणि नदीकाठी संरक्षक भिंत उभारणे यावरही त्यांनी भर दिला. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेसाठी महत्त्वाची असून त्यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले.

पूरबाधित नागरिकांना शासनाची मदत तातडीने मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीत मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी पावसाळ्यातील आपत्कालीन यंत्रणा हाताळण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील पूर क्षेत्राचा आराखडा तयार केला असून, नागरिकांना सूचना देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात असून, नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन पूर्ण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. डी. आव्हाड यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, महापालिका आणि पोलीस नियंत्रण कक्ष एकमेकांशी समन्वय ठेवून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी जिल्हा स्तरावर केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली.

यानंतर विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुराने बाधित होणाऱ्या पिंपरीतील काही भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

---------------------------------------------------------------------------------------------

#PimpriChinchwad #FloodRelief #DisasterManagement #MaharashtraNews #EmergencyResponse

आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे:अण्णा बनसोडे आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे:अण्णा बनसोडे Reviewed by ANN news network on ५/२३/२०२५ ०५:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".