रायगड: रायगड जिल्ह्यात मागील २४ तासांत १६०.४५ मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांमध्ये मालमत्तेचे अंशतः नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने २७ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पूरपरिस्थितीचा अहवाल जारी केला आहे.
अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस म्हसळा (२८२ मिमी), मुरुड (२५१.०० मिमी), पनवेल (२४५.२ मिमी) आणि अलिबाग (२४१.० मिमी) येथे झाला. सध्या रायगड जिल्ह्यात तुरळक पाऊस सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी पातळीवर वाहत आहेत. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
नुकसानीचा तपशील:
रायगड जिल्ह्यात मे २०25 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काही मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये अंशतः कच्च्या १३ घरांचे आणि २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. एक झोपडी पूर्णतः आणि १ गोठाही पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. याव्यतिरिक्त, २ आरोग्य केंद्र, २ स्मशानभूमी, १ मच्छिमार सोसायटी, १ पोल्ट्री आणि इतर ५ सार्वजनिक मालमत्तांचे अंशतः नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
तालुकानिहाय नुकसानीचा तपशील:
- अलिबाग: मौजे शिरवली येथे भरत तुकाराम म्हात्रे यांच्या घरांवर झाडाची फांदी पडल्याने पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले. मौजे खंडाळा येथे २४ घरांचे पत्रे उडून अंशतः नुकसान झाले. मौजे चिंचवली येथे संजय सिताराम नाखवा यांच्या घरासमोरील वायरवर वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले.
- मुरुड: मुरुड येथे रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू आहे. विहूर येथेही रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यात आले. गवळीवाडी, कोंडेपंचातन, बोर्ली पंचतन, वांजळे, हरिजन वस्ती येथे रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
- पनवेल: मौजे कामोठे, नौपाडा येथील वाडीमध्ये सकाळी साचलेले पाणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढण्यात आले. मौजे भाताण येथे चंद्रकांत भोईर यांच्या घरावर संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले, परंतु जीवितहानी झाली नाही.
- अपर पनवेल: वाकडी आदिवासी वाडी येथे चिमी सदू वाघ यांच्या घराची भिंत कोसळली, जीवितहानी नाही.
- माणगाव: तलाठी सजा-उणेगाव, मौजे उणेगाव येथे गणेश लक्ष्मण महाडिक यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले. तलाठी सजा-माणगाव येथे अद्याप कोणतेही नुकसान झालेले नाही.
- सुधागड: मौजे साई येथे नियाज अब्दुल्ला कोंडविलकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले. तालुक्यात एका म्हशीचा आणि एका बकरीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
--------------------------------------------------------------------------
#Raigad #HeavyRainfall #MaharashtraFloods #WeatherUpdate #PropertyDamage
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०६:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: