भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल, महिलांसाठी आणखी तीन हाऊस बोटी: उदय सामंत
रत्नागिरी: कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी 'उमेद' अंतर्गत तयार करण्यात आलेल्या हाऊस बोटीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते जांभारी बंदरात आज करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सामंत यांनी महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले आणि पर्यटकांशी नम्रतेने वागण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सिंधुरत्न समृद्ध योजना २०२३-२४ अंतर्गत पर्यटन वाढीसाठी 'उमेद'मार्फत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण झाले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी चेतन शेळके, बाबू म्हाप, सरपंच आदेश पावरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी फीत कापून बोटीचे लोकार्पण केले आणि बोटीची पाहणी केली. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांना ताकद देण्याचे वचन त्यांनी दिले. एक कोटी रुपयांची ही बोट महिला बचत गट चालवणार असून, भाट्ये येथे तीन बोटी देण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महिलांकडून हाऊस बोट चालवणारा हा देशातील आदर्शवत प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांचे काम सक्षमपणे करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे पालकमंत्री सामंत म्हणाले. रत्नागिरीतील नवीन बसस्थानकात बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारण्यात येईल. देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि सोफिया कुरेशीसारखी महिला युद्धजन्य परिस्थितीत जगाला माहिती देत आहे, याचा अभिमान वाटतो. देशातील सर्वोत्तम चहा आणि त्याच्या विक्रीचे स्टॉल रत्नागिरीत महिलांना दिले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.
---------------------------------------------------------------------------------------
#Houseboat #Jambhari #Umed #WomenEmpowerment #Tourism #Ratnagiri #UdaySamant #MaharashtraTourism
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ ०८:०५:०० AM
Rating:

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: