पुणे, दि. १२ मे २०२५: बुधवार पेठेतील क्रांतीचौकात एका क्षुल्लक कारणावरून तीन तरुणांनी एका फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाकडी फळी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी (वय १९ वर्षे, रा. दत्तवाडी, पुणे) यांच्या मित्राचे एका अज्ञात महिलेसोबत काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी शहाने अली सय्यद नुरइराणी (वय २५ वर्षे, रा. म. गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे), दुर्योधन अर्जुन रॉय (वय २२ वर्षे, रा. बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे) आणि अबुहुसेन शेख (वय १९ वर्षे, रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाकडी फळी व कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. आरोपींनी यावेळी शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने घटनेची माहिती फरासखाना पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने दखल घेत गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #BudhwarPeth #Assault #GangViolence #Arrested #FaraskhanaPolice #IndianJusticeCode #MaharashtraPoliceAct #ArmsAct #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: