'मॅग्नेटल बी पी एस' कॉल सेंटरची फसवणूक, ४१ मोबाईल जप्त
पुणे - पुण्यातील खराडी परिसरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मोठ्या सायबर फसवणुकीचे जाळे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री केलेल्या अचानक छाप्यात 'मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी' नावाच्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत शंभरहून अधिक संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक करत होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी ४१ मोबाईल फोन आणि अनेक लॅपटॉप जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे फसवणुकीची खरी व्याप्ती किती आहे याचा सखोल तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास चालू आहे. ताब्यात घेतलेल्या उर्वरित व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हेगारीविरुद्धच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
पोलिस सूत्रांच्या मते, या प्रकरणाच्या सविस्तर तपासानंतर सायबर फसवणुकीचे आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
#PunePolice #CyberCrime #CallCenterFraud #Kharadi #SyberSecurity #IndiaNews #FraudBust #PoliceRaid #CyberFraud #PuneCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: