उरण : उरण तालुक्यातील सारडे गावचे चित्रकार कुणाल रामचंद्र पाटील यांनी पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेले भारतीय सैनिक संदीप गायकर यांच्या स्मरणार्थ एक खास रेखाचित्र साकारले आहे. कुणाल यांनी पेन, पेन्सिल आणि कोळशाचा वापर करून हे चित्र रेखाटले असून, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना त्यांनी या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संदीप गायकर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य दाखवले आणि वीरमरण पत्करले. त्यांच्या या बलिदानाला अनेक स्तरांवरून आदरांजली वाहण्यात येत आहे. याच भावनेतून कुणाल पाटील यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गायकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कुणाल पाटील हे एका खासगी कंपनीत कार्यरत असले तरी, त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक चित्रे रेखाटली आहेत आणि आता हुतात्मा जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी साकारलेले हे रेखाचित्र विशेष लक्ष वेधून घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा