सिंधुदुर्गनगरी, दि. २४: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ‘अलर्ट मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. नैसर्गिक आपत्ती अचानक येत असल्या तरी संभाव्य धोके ओळखून नुकसान कमी करण्यासाठी सज्ज राहावे. सर्व विभागांनी समन्वय साधून मदतकार्य आणि माहितीची देवाणघेवाण जलद गतीने करावी. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीश राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, पावसामुळे वीजपुरवठ्यात अनेक समस्या येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महावितरण विभागाने अधिक सतर्क राहावे. कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची काळजी घ्यावी. भविष्यात महावितरणच्या दुरुस्ती कामांसाठी एक विशेष आर्थिक पॅकेज आणले जाईल, ज्यामुळे जिल्ह्यातील वीजेची समस्या कायमस्वरूपी सुटेल. तसेच, डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यातील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नियमितपणे भेटी देऊन कामाचा आढावा घ्यावा. कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शिवापूर, वसोली, उपवडे, आंजिवडे, दुकानवाड या गावांचा संपर्क तुटलेला असून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या भागात वीज आणि मोबाईल नेटवर्क नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. दुकानवाड येथे पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. घाट परिसरात दरडी कोसळल्यास संबंधित यंत्रणांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून दरड हटवून वाहतूक सुरळीत करावी. कंत्राटदारांनी आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार दरडी कोसळतात, अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे. अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच, कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करावी. वन विभागाने यापुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कामे पूर्ण करावीत. रस्त्यावर झाड पडल्यास ते त्वरित बाजूला करण्याची व्यवस्था करावी आणि धोकादायक झाडे व फांद्या तोडण्यात याव्यात. एसटी विभागाने पावसामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे तातडीने हाती घ्यावीत, जेणेकरून स्वच्छता राहील. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र बसून आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या नियोजनावर विचारविनिमय करावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
- --------------------------------------------------------------------
- #Sindhudurg #DisasterManagement #NiteshRane #MaharashtraRains #EmergencyPreparedness #PowerInfrastructure #RoadRepairs #PublicSafety #Monsoon2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा