भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहनचोर जेरबंद
पुणे, १७ मे २०२५: भारती विद्यापीठ पोलिसांनी एका वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेले दोन रिक्षा आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे. या कामगिरीमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांचे पथक वाहन चोरांचा शोध घेत असताना, त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीमध्ये, मजीद युनूस अन्सारी (वय २२, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून काही रिक्षा आणि दुचाकी गाड्या चोरून कात्रज-कोंढवा रोडवरील पेरूच्या बागेजवळ लपवून ठेवल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पेरूच्या बागेजवळ छापा टाकला. तेथे त्यांना मजीद युनूस अन्सारी मिळून आला, आणि त्याच्याकडून चोरी केलेले दोन तीन-चाकी रिक्षा आणि एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली.
तपासात, आरोपी मजीद युनूस अन्सारी याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांसह, येरवडा पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे आणि निलेश खैरमोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
-----------------------------------------------------------------------------------------
#PunePolice #VehicleTheft #Arrest #CrimeInvestigation #MaharashtraCrime
Reviewed by ANN news network
on
५/१८/२०२५ ०२:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: