मंगळवार, २७ मे, २०२५

खेड तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार; एक मृत्यू

 


खेड, २७ मे - मागील २४ तासांपासून खेड तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. या अतिवृष्टीमुळे भीमा नदी आणि स्थानिक ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाईट परिसरातील भामासखेड धरणाजवळ मासेमारी करताना वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सर्व गावे आणि मुख्य रस्ते जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

भोरगिरी परिसरातील जोरदार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला आहे. भोरगिरी परिसरात २०० मिलीमीटर तर कळमोडी, चासकमान आणि भामासखेड धरण परिसरात ५०-७० मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. पाभे गावातील पूल कम बंधारा पाण्याखाली गेल्याने गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. सोमवारी रात्रभर आणि दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चाकण येथे महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. फरशी भोसे ते काळूस पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारा संपर्क तुटला आहे.  पाईट येथे भामासखेड धरणाजवळ मासेमारी करताना वेताळ येथील संतोष गुलाब खंडवे या तरुणावर वीज पडली. त्याचा जागीच मृत्यू झाला.  चाकण जवळील बिरदवडी पाडा येथील महिंद्रा कंपनी परिसरात ५०-६० लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. आपदामित्र आणि पोलीस  त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. 


#MaharashtraFloods #KhedTaluka #MonsoonRains #FloodAlert #WeatherDisaster #Maharashtra #IndiaWeather #FloodRescue #AgriculturalLoss #EmergencyResponse

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा