रविवार, २५ मे, २०२५

सॅन होजे येथे दुसऱ्या 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा!

 

अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी साकारण्याचे स्वप्न; २५ ते २७ जुलैला रंगणार महोत्सव

मुंबई: 'देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजीत घोलप यांच्या 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' (नाफा) च्या वतीने कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे दुसऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २५, २६ आणि २७ जुलै २०२५ रोजी हॉलिवूडच्या धर्तीवर संपन्न होणार असल्याची घोषणा नुकतीच अभिजित घोलप यांनी केली.

गेल्या वर्षी 'नाफा'चा पहिला महोत्सव २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी सॅन होजे येथे मोठ्या उत्साहात पार पडला होता. उत्तर अमेरिका आणि कॅनडामधील सुमारे साडेपाच लाख मराठी भाषकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने अभिजित घोलप 'नाफा'च्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांच्या माध्यमातून 'गुलकंद', 'सुजित सुशीला', 'संगीत मानापमान', 'चिकीचीकी बुबुम्बुम', 'पाणी', 'गुलाबी', 'नवरा माझा नवसाचा २', 'अशी ही जमवा जमावी', 'स्थळ' आणि 'सलतात रेशीम गाठी' यांसारखे अनेक मराठी चित्रपट अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

अभिजित घोलप अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्याच्या दिशेने कार्यरत असून, अनेक तरुण कलावंत आणि प्रेक्षक 'नाफा'शी जोडले जात आहेत. घोलप म्हणाले की, 'देऊळ' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. या विचाराला ५०० हून अधिक सदस्यांनी प्रतिसाद दिला. 'नाफा'च्या माध्यमातून लघुपट निर्मितीसाठी 'फिल्म क्लब'ची स्थापना करण्यात आली असून, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या कार्यशाळेसह डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि समीर चौघुले यांच्यासारख्या दिग्गजांच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

'नाफा २०२४' मध्ये दिलीप प्रभावळकर, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर आणि सुबोध भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावर्षी होणाऱ्या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या प्रमुख कलाकारांची उपस्थिती असणार आहे. 'नाफा' महोत्सवाला अमेरिकेतील 'बीएमएम'च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------

 #NAFAFilmFestival #MarathiCinema #SanJose #California #AbhijitGholap #MarathiCulture #IndianDiaspora #FilmFestival #Entertainment #USA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा