उरणच्या नागरिकांचा प्रशासनाला उत्स्फूर्त प्रतिसाद: मॉक ड्रिल यशस्वी

 


'ऑपरेशन सिंदूर'ला उरणकरांचा पाठिंबा; मॉक ड्रिलच्या माध्यमातून सतर्कतेचा संदेश

विठ्ठल ममताबादे

उरण : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने उरणमध्ये आज 'ऑपरेशन अभ्यास' या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रिलद्वारे पोलीस प्रशासन आणि शासकीय यंत्रणेने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा, याबाबत सतर्कतेचा इशारा दिला. उरणमधील नागरिकांनीही या मॉक ड्रिलला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले.

केंद्रीय गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी आज दुपारी ४ वाजता उरणमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. या दरम्यान, शहरातील तहसील कार्यालय, ओएनजीसी कॉलनी, चाणजे ग्रामपंचायत, जीटीपीएस कंपनी, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, मोरा बल्क गेट या ठिकाणी सायरन वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला. तर, एन.आय. स्कूल आणि पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित प्रात्यक्षिक झाले. नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक आणि इतर आपत्कालीन सेवांनी बचावकार्य, शोध मोहीम आणि नागरिकांसाठी मार्गदर्शन केले.

या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ वाजता उरण शहरात ब्लॅक-आऊटची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यावेळी शहरातील विद्युत पुरवठा १० मिनिटांसाठी खंडित करण्यात आला होता. नागरिकांनीही या काळात घरातील इन्व्हर्टर आणि जनरेटरचा वापर टाळत प्रशासनाला सहकार्य केले.

उरण शहराची निवड या मॉक ड्रिलसाठी विशेषत्वाने करण्यात आली होती. समुद्रकिनारी असलेले आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने या भागाला दहशतवादी धोक्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वीही समुद्राच्या मार्गाने दहशतवादी आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मुंबई, तारापूर आणि उरण यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश पहिल्या टप्प्यातील मॉक ड्रिलमध्ये करण्यात आला होता.

मॉक ड्रिलदरम्यान खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. विशाल नेहूल, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, तहसीलदार उद्धव कदम यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विशाल नेहूल म्हणाले की, एअर स्ट्राईक किंवा युद्धजन्य परिस्थितीत सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले जाते. मॉक ड्रिलचा उद्देश नागरिकांना अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी, याची माहिती देणे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी सांगितले की, हे मॉक ड्रिल यशस्वी झाले असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केले. तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळावी, याचे प्रात्यक्षिक नागरिकांनी पाहिले आणि ते उपयुक्त ठरले. आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, उरण हे महत्त्वाचे केंद्र असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उरणकर सज्ज आहेत. मुख्याधिकारी समीर जाधव यांनी मॉक ड्रिलबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केल्याची माहिती दिली.

दरम्यान, उरणमधील नागरिकांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चे उस्फूर्त स्वागत केले आहे. उरणकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

.....................................

  • #OperationAbhyas
  • #UranMockDrill
  • #MaharashtraPolice
  • #AntiTerrorismDrill
  • #SecurityAlert
  • #Uran
  • #IndiaFightsTerrorism
  • उरणच्या नागरिकांचा प्रशासनाला उत्स्फूर्त प्रतिसाद: मॉक ड्रिल यशस्वी उरणच्या नागरिकांचा प्रशासनाला उत्स्फूर्त प्रतिसाद: मॉक ड्रिल यशस्वी Reviewed by ANN news network on ५/०७/२०२५ ०७:५४:०० PM Rating: 5

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    Blogger द्वारे प्रायोजित.
    Do you have any doubts? chat with us on WhatsApp
    Hello, How can I help you? ...
    Click me to start the chat...
    ".