कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा व रॅली
पिंपरी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त भव्य बाईक रॅली आणि पायी फेरीचेही आयोजन करण्यात आले होते.
तुकाराम नगर येथून सुरू झालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. तसेच कामगार नगर व संत तुकाराम नगर परिसरात पायी रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भोसरी, चाकण, आळंदी, पिंपरी, चिंचवड, सणसवाडी, शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील हजारो कामगार व नागरिक सहभागी झाले होते.
कंत्राटी पद्धतीतून कामगारांची होते पिळवणूक
यावेळी भोसले यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "खाजगी कंपन्यांमध्ये, शासनाच्या विविध खात्यांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यामध्ये तरुणांना कायद्यानुसार कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याऐवजी कंत्राटी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून सर्रास श्रमिक तरुणांची आर्थिक व शारीरिक पीळवणूक केली जात आहे."
वाढती आर्थिक विषमता चिंताजनक
भोसले यांनी आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त केली. "या पिळवणुकीमुळे आर्थिक दृष्ट्या देश कमकुवत होत आहे. श्रीमंत आणि गरीब यामध्ये खूप मोठी दरी वाढत चालली आहे. ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार श्रमिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
कायद्यात श्रमिकांचे हित जपण्याची गरज
भोसले पुढे म्हणाले, "सरकारने ज्यांनी आपली उभी हयात श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य घालवले आहे अशा त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे बनवले पाहिजेत आणि त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संरक्षण दिले तरच समाजातील संतुलन टिकणार आहे."
"सरकारी अधिकारी न्याय देत नाहीत, न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास विलंब लागतो, राजाश्रय मिळालेले ठेकेदार - या सर्व साखळीमध्ये श्रमिक व शेतकरी जखडला गेला आहे. भांडवलदाराच्या आणि ठेकेदाराच्या दबावाखाली कामगार व शेतकरी विरोधी धोरण तयार होत असेल तर सरकारवर श्रमिक व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन उभे केले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवडमधून चळवळीची सुरुवात
भोसले यांनी या आंदोलनाची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी कामगारांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राहुल लांडगे, बाळासाहेब गावडे, संभाजी विरकर, रमेश वाहिले, शंकर गावडे, राजू पवार, ईश्वर यादव, अमोल घोरपडे, राजू आरणकल्ले, अर्ष जागीरदार तसेच वाय.सी.एम. हॉस्पिटलचे सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.
..................................
#LaborDay
#YashwantBhosale
#LaborMovement
#PimpriChinchwad
#NationalLaborAghadi
#ContractLabour
#LabourRights
#MaharashtraDay
#EconomicInequality
#WorkerUnity
Reviewed by ANN news network
on
५/०१/२०२५ ०५:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: