मतदारांसाठी ५ लाख पाणी बाटल्यांची व्यवस्था
१५ हरित मतदान केंद्रे होणार स्थापन
५५० सुरक्षारक्षक तैनात
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विशेष नियोजन केले असून, मतदारांसाठी अभूतपूर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना पिण्यासाठी ५ लाख पाणी बाटल्या, १५ हरित मतदान केंद्रे आणि इतर विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हा निवडणूक निरीक्षकांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ याप्रमाणे एकूण १५ हरित मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ३०० सुरक्षारक्षक आणि २५० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तसेच २७० एनसीसी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांवर पार्किंग, दिशादर्शक फलक, कलर कोडिंग व्यवस्था, आपत्कालीन विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एका इमारतीत ८ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या २७ ठिकाणी विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
"मतदान केंद्रांवर किमान सुविधा उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी," असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी दिले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: