पुणे : रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. पुण्यातील रिक्षाचालकांना आदराने वागवून त्यांचा सन्मान वाढवण्याचे संस्कार स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी समाजावर घडवले होते. त्यांनी रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता "रिक्षावाले काका" असे सन्मानपूर्वक संबोधण्याची पद्धत रुजवली. यामुळे या व्यवसायिकांना प्रतिष्ठा मिळाली. या परंपरेला पुढे नेण्याचा व रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीत रिक्षाचालकांच्या कल्याणाचा मुद्दा अग्रभागी
दत्तवाडी, साने गुरुजी नगर या परिसरात हेमंत रासने यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनिता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजनांचा मसुदा
हेमंत रासने म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे ठरवले आहे. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी एक महामंडळ स्थापन केले जाणार आहे. या महामंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षाचालकाला जीवन विमा कवच आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. तसेच, अपघातात कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची मदत मिळेल. रिक्षाचालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल करण्यात येणार आहे, ज्यामुळे ते रोजगारक्षम होऊ शकतील. तसेच रिक्षाचालकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या सर्व योजना कसबा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.
रिक्षाचालकांसाठी आरोग्य आणि आर्थिक सुविधा
रासने पुढे म्हणाले की, रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बेताची असते. कृतज्ञतेच्या भावनेने मध्य वस्तीतील १२०० रिक्षाचालकांना गणवेश वितरित करण्यात आले. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रिक्षाचालकांना आरोग्य सुविधा दिल्या गेल्या, ज्याचा अनेक रिक्षाचालकांनी लाभ घेतला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, रिक्षाचालकांवर सक्तीचा लादलेला दररोजचा ५० रुपयांचा वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द करण्यासाठी आग्रही राहणार आहेत.
रिक्षा ॲप आणि सीएनजी किटसाठी अनुदान
रासने यांनी शहरात रिक्षा ॲपची संकल्पना पुढे नेण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, मेट्रोला पूरक अशा नव्या शेअर रिक्षा धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून रिक्षांना सीएनजी किटसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात आले आहे. तसेच शहराच्या वाढत्या हद्दीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा स्टँडची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
रिक्षाचालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रतिबद्ध
हेमंत रासने म्हणाले, "रिक्षाचालकांचा आदर आणि सन्मान राखून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. रिक्षाचालकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही साकारू."
रिक्षाचालकांसाठी आखलेल्या या विविध योजनांमुळे पुण्यातील रिक्षाचालकांना भविष्यात चांगले आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०८:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: