अनिल देशमुखांचे पितळ उघडे पडले : देवेंद्र फडणवीस


नरखेड (प्रतिनिधी): निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या मुलाखतीमुळे शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पितळ उघडे पडले आहे, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नरखेड येथे झालेल्या जाहीर सभेत केला. आपण अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेली नाही या न्या. चांदिवाल यांच्या वक्तव्याचा उल्लेख करुन श्री. फडणवीस म्हणाले की,  प्रकृतीच्या कारणास्तव अनिल देशमुखांना जामीन देण्यात आला आहे. यामुळे देशमुख जे काही बोलताहेत त्याची पोलखोल झाली आहे.

या सभेला काटोल येथील भाजपा - महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, शामराव बारे, उमेश चव्हाण,राजेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूरला देशाची लॉजिस्टिक राजधानी करायची असेल तर नागपूरला जेएनपीटी बंदराशी जोडणारा महामार्ग तयार करावा लागेल हे लक्षात घेऊन समृद्धी महामार्ग करण्यात आला. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. लवकरच नागपूर हे लॉजिस्टिक हब होणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

काटोल भागाच्या विकासासाठी या भागात उद्योग येण्याची आवश्यकता आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच या परिसरात सूतगिरणी आणणार. आम्ही एमआयडीसी ओसाड राहू देणार नाही. तसेच नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याचे उत्पादन होत असतानाही त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही हे लक्षात घेऊन काटोल मतदारसंघात संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीला चालना देण्यात येईल. त्यासाठी सर्व प्रकारचे अनुदान आणि मदत करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

या भागातील चित्र पालटण्यासाठी आपले सरकार येताच मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील नागरिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करून सर्व अडचणी सोडवणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सावनेर, काटोल, नरखेड आणि कळमेश्वर या तालुक्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नजिकच्या काळात येथील शेतीमध्येही मोठी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल देशमुखांचे पितळ उघडे पडले : देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांचे पितळ उघडे पडले :  देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ११/१३/२०२४ ०९:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".