पुणे - "कोणताही धर्म नव्हे तर देशच धोक्यात आहे आणि त्याला भाजपचे द्वेषपूर्ण राजकारण कारणीभूत आहे," असा गंभीर आरोप राजस्थानचे माजी मंत्री आणि अजमेर शरीफ दर्गा समितीचे माजी अध्यक्ष अमीन पठाण यांनी आज केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पठाण यांनी या द्वेषपूर्ण राजकारणाविरोधात महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. या परिषदेला भारत जोडो अभियानाचे समन्वयक इब्राहिम खान आणि मराठी मुस्लिम सेवा संघाचे पुणे शहराध्यक्ष जावेद शेख उपस्थित होते.
"भाजपच्या अनेक योजना गेल्या दहा वर्षांत अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे आता ते 'मंगळसूत्र तोडले जाईल', 'जमिनी ताब्यात घेतल्या जातील' अशा भडक मुद्द्यांवर उतरले आहेत," असे पठाण म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, "अनेकतेतून एकता" हे भारताचे वैशिष्ट्य असताना सत्तेसाठी देशाला द्वेषाच्या खाईत लोटण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
पठाण यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीकडेही लक्ष वेधले. "सध्याच्या सरकारने गुंडांना मोकळीक दिली आहे. राहुल गांधी आणि त्यांचे सहयोगी पक्षच केवळ संविधान, प्रेम आणि रोजगारांविषयी बोलत आहेत," असे त्यांनी नमूद केले.
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास भाजपचे केंद्रातील सरकार लवकरच कोसळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०२:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: