पुणे - "हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही बहुमताने महायुती सरकार सत्तेत येईल," असा विश्वास हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांवर टीका केली.
"हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकारला बहुमत मिळाले, त्यात गरिबांचा मोठा वाटा आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मतांची विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते, हा त्यांचा पूर्वइतिहास आहे," असे सैनी म्हणाले.
राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा निवडणुकीत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून व्होट बँक राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.
"मोदी सरकारच्या काळात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या कारकीर्दीत जेवढी घरे बांधली, त्याच्या दुप्पट घरे मोदी सरकारने दहा वर्षांत बांधली," असे सैनी यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा, रेल्वे सेवा, विमानतळ विस्तार, आरोग्य व्यवस्था आणि सीमावर्ती भागातील सुरक्षा यांमध्ये मोदी सरकारने महत्त्वपूर्ण काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ११:१३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: