फैजपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी फैजपूर येथे आयोजित प्रचारसभेत महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. अमोल जावळे, भाजपा- महायुतीचे रावेर मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ बोलताना त्यांनी औरंगजेबाचे विचार पाळणाऱ्या महाआघाडीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे ठासून सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, "मोदी सरकारने अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, आणि सोमनाथ मंदिराचे सुवर्णवैभव परत आणले आहे. महाराष्ट्रातही महायुतीने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केले, परंतु महाआघाडीने विरोध केला. आजच्या शिवप्रताप दिनी आपण महायुतीच्या विजयासाठी सज्ज होऊन महाराष्ट्राचा स्मार्ट विकास साधावा," असे आवाहन त्यांनी केले.
महाआघाडीवर टीका
"महाआघाडीचे नेते काश्मीरच्या कलम ३७० हटविण्यास, राम मंदिर उभारणीस, तिहेरी तलाक रद्द करण्यास विरोध करतात. त्यांच्या या विरोधाच्या भावनेने देशाच्या विकासाची गती थांबविण्याचे प्रयत्न होत आहेत," असे शाह म्हणाले.
परकीय गुंतवणुकीत वाढ
"महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राने देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ५२% गुंतवणूक प्राप्त केली आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे," अशी ग्वाही शाह यांनी दिली.
योजना व संकल्पपत्र
"महायुती सत्तेवर राहिल्यास गॅस सिलिंडर, धान्य वितरण, जनधन योजना, लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांची व्याप्ती वाढविली जाईल. वृद्धांचे निवृत्तीवेतन, विद्यावेतन, रस्तेबांधणी, आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्याचे संकल्प आमचे आहेत," असे ते म्हणाले.
अमित शाहांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
"राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याला ठाकरे समर्थन देत आहेत का? हिंमत असेल तर राहुल गांधींना शिवरायांवर आदराचे शब्द बोलायला सांगा," असे आव्हान देत त्यांनी महाआघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीच्या समर्थनाचे आवाहन केले. फैजपूर येथे उपस्थित नागरिकांनी त्यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद दिला.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: