"८५ व्या वर्षी थोपटे यांच्या 'शिल्पसाधना' पुस्तकाचे प्रकाशन"
पुणे : प्रख्यात शिल्पकार आणि चित्रकार प्राचार्य दिनकर शंकर थोपटे यांच्या ८५ व्या वर्षानिमित्त 'कला साधना' हे विशेष चित्र-शिल्प प्रदर्शन येत्या २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान राजा रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात थोपटे यांच्या 'शिल्पसाधना' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक रामदास फुटाणे आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात महाकवी कालिदासांच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या नाटकावर आधारित विशेष चित्रमालिका, तसेच थोपटे यांच्या विविध शिल्पकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिल्पकार थोपटे यांनी अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून अनेक कलाकार घडवले आहेत. फायबर ग्लासमधील त्यांच्या शिल्पकृती देशभरात प्रसिद्ध आहेत. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
क्षितिज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'शिल्पसाधना' या पुस्तकाचे शब्दांकन स्वाती जरांडे यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या संयोजन समितीत शिल्पकार दीपक थोपटे, संतोष पवार, बापू झांजे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यरत आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०४:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: