पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत सराईत वाहनचोराला अटक केली आहे. या कारवाईत १३ चोरीच्या मोटारसायकली आणि २ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून, एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखा युनिट २ ची ही उल्लेखनीय कामगिरी आहे.
पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ५ ऑक्टोबर रोजी खराळवाडी, पिंपरी भागात सापळा रचला.
संशयित शंकर भरत देवकुळे (वय ३२, रा. उरुळी देवाची) याला चोरीच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कबुलीनंतर केलेल्या तपासात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, शांतीनगर आणि भिवंडी येथून चोरलेल्या १३ मोटारसायकली व २ ऑटोरिक्षा हस्तगत करण्यात आल्या.
आरोपीने मेट्रो स्टेशन परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याविरुद्ध पिंपरी, निगडी, भोसरी, चिंचवड, दिघी, रावेत, खडकी, हडपसर, भारती विद्यापीठ, वानवडी आणि शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हँडल लॉक करून पार्क करावीत आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवावे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: