पनवेल : पनवेल, नवी मुंबई आणि दिल्ली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २०.६२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने सागर जुगेश मेहरा, अभय सुनिल कुमार, नैन शिखा सागर मेहरा आणि अनुज विरसिंग छारी या चौघांना अटक केली. या टोळीने नवी मुंबई परिसरात जबरी चोरी, वाहन चोरी तसेच दिल्ली येथे गुन्हे केले होते.
पोलिसांनी या टोळीकडून ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन केटीएम मोटारसायकली जप्त केल्या. यात एक सोन्याचे मंगळसूत्र, तीन सोन्याच्या साखळ्या आणि दोन तुटलेल्या साखळ्यांचे तुकडे समाविष्ट आहेत.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजय लांडगे आणि पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
कामोठे पोलीस ठाण्यात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याच्या घटनेनंतर या टोळीचा शोध सुरू झाला. सीबीडी, खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरूळ, वाशी, सानपाडा आणि कामोठे परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले होते.
पथकाने एक आठवडा तांत्रिक तपास केला आणि उलवे परिसरातील सोसायट्या व गेस्ट हाऊस तपासून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाविरुद्ध दिल्ली येथे गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याच्याविरुद्ध चार गुन्ह्यांत जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत.
या कारवाईमुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: