राजमाता जिजाऊ कॉलेजचे विद्यार्थी ठरले जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत अव्वल; १७ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
पुणे : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत कॉलेजच्या १७ खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये बाजी मारली असून त्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी ४x१०० मीटर आणि ४x४०० मीटर रिले स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्वल पवार, अरविंद कुशवाह, रणजीत गौतम, कृष्णा गिरी आणि रवी कुशवाह यांनी मुलांच्या गटात, तर कार्तिकी गुळुंजकर, सिद्धी राणे, आर्या नाईक, सानिका माने आणि पूजा जाधव यांनी मुलींच्या गटात ही कामगिरी केली.
वैयक्तिक स्पर्धांमध्येही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. १०० मीटर धावण्यात अरविंद कुशवाह प्रथम आला, तर सिद्धी राणे आणि कार्तिकी गुळुंजकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. ४०० मीटर धावण्यात पूजा जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवला.
भालाफेकीत श्रावण तेलंगे प्रथम आला, तर आर्यन क्षीरसागर व अनुराधा फुगे यांनी तृतीय स्थान पटकावले. लांब उडीत निता जाधव हिने द्वितीय, तर अरविंद कुशवाह याने तृतीय क्रमांक मिळवला. थाळी फेकीत हरीकला शाही हिने द्वितीय स्थान पटकावले.
या यशस्वी खेळाडूंना कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून त्यांना विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे खजिनदार अजित गव्हाणे, संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे यांनीही खेळाडूंचे कौतुक केले.
आता २१ आणि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवरानगर, अहमदनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत या १७ खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत चमकदार यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: