१८० निराधार बालकांना दिवाळीची भेट; नवे कपडे व पाहुणचाराचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी): श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग) यांनी दिवाळीनिमित्त १८० निराधार बालकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. बुधवारी तुळशीबागमधील अगत्य हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमात मुलांना अल्पोपहारासह नवीन कपड्यांची भेट देण्यात आली.
सलग आठव्या वर्षी आयोजित या कार्यक्रमास हेमंत रासने, आशिष शहा आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल दहिभाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सागर सुनिल दहीभाते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमात बोलताना हेमंत रासने यांनी मंडळाच्या समाजकार्याचे कौतुक केले. "येणारी पिढी देशाची अमूल्य संपत्ती आहे. आपले सण-परंपरा जपताना समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, अशी काळजी घेणाऱ्या मनांकडूनच राष्ट्राची खरी सेवा होते," असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी अरविंद तांदळे, सिद्धार्थ सातपुते, गजानन शालगर, नरेश तडका, रुपेश व्हावळ, प्रताप बिराजदार यांच्यासह तुळशीबाग परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. सोमनाथ भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
आशिष शहा आणि सुनिल दहिभाते यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत, असेच समाजोपयोगी कार्य सातत्याने सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाद्वारे समाजातील वंचित घटकांप्रती असलेली संवेदनशीलता दिसून आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: