पुणे : महात्मा गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने पुणे शहरात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने 'दंगलमुक्त पुणे' या संकल्पनेवर आधारित 'शांती मार्च' काढण्यात आला.
सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेल्या या मार्चने गोखले चौक (कलाकार कट्टा) ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (डेक्कन) ते कर्वे पुतळा (कोथरूड) आणि शेवटी महात्मा गांधी पुतळा (गांधी भवन) असा मार्ग अनुसरला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मार्चमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी 'महात्मा गांधी अमर रहे', 'दंगल आहे अमंगल', 'जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका', 'बलवान माणूसच क्षमा करू शकतो', 'गांधी विचार - राष्ट्रीय एकात्मतेचा आधार', 'जात-पात बंधन तोडो', 'महात्मा गांधी म्हणजे प्रेम, सद्भाव आणि एकोपा' अशा आशयाचे फलक हाती घेतले होते.
या उपक्रमात डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रा. सौ. रमा सप्तर्षी, जांबुवंत मनोहर, एड. स्वप्नील तोंडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच भारती विद्यापीठ, एमसीई सोसायटी, पूना कॉलेज, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय यांसारख्या शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस, माहेर संस्था, रुग्ण हक्क परिषद, जमाते इस्लामी हिंद यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मार्चाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. गांधी भवन येथे समारोप प्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबरोबरच, गांधी भवन येथे सकाळी प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच गांधी जयंती निमित्त दुपारी प्रसाद भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पुढील आठवड्यात विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, प्रा. डॉ. मणिंद्रनाथ ठाकूर, निखिल वागळे यांसारख्या मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
गांधी भवन येथे सप्ताहभर खादी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल उभारले जाणार आहेत. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाद्वारे समाजात शांतता, सद्भाव आणि एकोपा वाढवण्याचा संदेश देण्यात आला असून, गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२४ ०८:२५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: