पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शक्तीत आज मोठी भर पडली आहे. पुणे येथील निसर्ग कार्यालयात आयोजित एका भव्य कार्यक्रमात, पक्षाचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रसिद्ध आंबेडकरवादी नेते आणि कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील ॲड. राहुल मखरे यांनी केले. मखरे यांनी स्वतः आपल्या अनुयायांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या ३५ वर्षांपासून शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रसार करणारे मखरे यांनी याआधी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव म्हणून काम केले आहे.
या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) आगामी विधानसभा, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मखरे यांच्यासोबत अनेक प्रमुख नेत्यांनीही पक्षात प्रवेश केला. यामध्ये बाबजी नाना भोंग, महावीर वजाळे (माजी प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा), राजकुमार धोत्रे (अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र), गौरव पनोरेकर (युवा नेते), ॲड. सुनील आवारे (माजी प्रभारी बसपा-मुंबई प्रदेश), वसीम सय्यद, वैशाली राक्षे, स्वराज सोनवणे, आणि राज पाटील (नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत आणि प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांनीही हजेरी लावली. तसेच रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष पंढरीनाथ पाटील आणि जिल्हा सरचिटणीस करण भोईर हेही उपस्थित होते.
या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात नवीन चर्चेला उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची स्थिती अधिक मजबूत झाली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२४ ०८:३८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: