रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे लोकार्पण (VIDEO)

 


कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय :  उदय सामंत

रत्नागिरी : कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारे हॉस्पीटल असले पाहिजे. त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

     रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे लोकार्पण कोनशिला अनावरण करुन आणि फित कापून पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्याधिकारी तुषार बाबर, साधना फाऊंडेशन ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. समीधा गोरे, डॉ. जे. बी. भोर, डॉ. सतीश पुराणिक, विलास ठुसे, डॉ. नमिता भिवणकर, डॉ. रविंद्र परदेसी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मी डॉक्टर व्हावे, अशी आई-वडीलांची इच्छा होती. परंतु, सामाजिक क्षेत्रात वेगळ्या पध्दतीने वलय निर्माण करण्यासाठी मी या क्षेत्रात उतरलो. विकासात्मक कामाच्या डोलाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे ताकद दिली आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली विकास कामे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचे कॅशलेस हॉस्पीटल ठाण्यामध्ये पाहिले आणि त्याचवेळी असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल रत्नागिरीमध्येही करण्याचा निर्णय घेतला. इतिहासात याची निश्चितच नोंद होईल. 

    ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आपले आजारपण कुटुंबावर आर्थिक भार नको म्हणून, अंगावर काढत असते. अशा लोकांसाठी, गरिबांना न्याय देणारे हॉस्पीटल असले पाहिजे आणि त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. या कॅशलेस रुग्णालयामुळे निश्चितच गरीब लोकांची सोय झाली आहे. जी काही विकासात्मक कामे झाली, ती मुख्यमंत्री महोदयांमुळे झाली. रत्नागिरीकर त्यांच्या कायम ऋणात राहणार आहे. कोविड सारख्या कठीण काळात डॉक्टर आणि नर्स हे देवदूतासारखे धावून आले. कोविडमध्ये केलेल्या कामामुळे त्यांच्याविषयीचा आदर कायम राहील, असेही पालकमंत्री म्हणाले. 

मुख्याधिकारी बाबर प्रमाणिक अधिकारी

   शारीरिक परिस्थितीवर मात करुन एखादा अधिकारी कसा सकारात्मक काम करतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे, मुख्याधिकारी तुषार बाबर आहेत. प्रमाणिकपणे शहराच्या विकासासाठी काम करत आहेत, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

    दिवसनिहाय या हॉस्पीटलसाठी पालकमंत्र्यांनी नियोजन केल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासनातर्फे केली जाईल. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ या हाॕस्पीटलमधून मोफत दिला जाईल. या रुग्णालयाची जास्त गरज भासू नये, म्हणजेच लोकांचे आरोग्य निरोगी रहावे, असेही ते म्हणाले. प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ यांनी सविस्तर प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला राहूल पंडीत, सुदेश मयेकर, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे लोकार्पण (VIDEO) रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे लोकार्पण (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/०६/२०२४ ०४:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".