नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या विविध मागण्यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाला आज तिसरा दिवस उजाडला. गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सिडको महामंडळाचे होत असलेले दुर्लक्ष हे या आंदोलनामागील प्रमुख कारण आहे.
कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विशाल भोईर, अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे आणि सचिव संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. चांगुणा डाकी, किरण केणी, प्रवीण मुत्तेमवार, यशवंत भोपी आदी प्रकल्पबाधित या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देणे, मच्छिमारांना नुकसान भरपाई देणे, बेरोजगार युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देणे, वाघीवली गावातील प्रकल्पग्रस्तांना घरांचे भूखंड देणे, घरभाडे भत्ता वाढविणे इत्यादींचा समावेश आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे सचिव संजय ठाकूर यांनी सांगितले की, "गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक आंदोलने, बैठका आणि पत्रव्यवहार केला, परंतु सिडकोकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही." त्यांनी २३ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीचाही उल्लेख केला, ज्यात प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा झाली होती, परंतु त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही.
प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त आणि कमिटीच्या सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी सिडको प्रशासनाला त्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: