पुणे : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, हा दिवस महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी बांधवांसाठी अभिमानाचा ठरला आहे. मराठी भाषेच्या अभिजाततेसाठी अनेक विद्वान, साहित्यिक आणि अभ्यासकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या निर्णयानंतर मराठी भाषा आणि तिची सांस्कृतिक ओळख आणखी बळकट होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता 'अभिजात मराठी भाषेचा आनंदोत्सव' साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मराठी भाषेचे प्रेमी, साहित्यिक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांनी या आनंदोत्सवात मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि संवादचे सुनील महाजन यांनी केले आहे.
मराठीच्या अभिजाततेसाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. विविध संघटना आणि अभ्यासकांनी मराठीच्या साहित्यिक परंपरा, सांस्कृतिक महत्त्व आणि तिच्या विकासाचे प्रमाण केंद्र सरकारसमोर सादर केले होते. प्रसारमाध्यमांनी देखील मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून भाषेच्या विकासासाठी अधिक धोरणात्मक पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे. विशेषत: शैक्षणिक अभ्यासक्रम आणि संशोधन केंद्रांची रचना यावर भर दिला जाणार आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ १२:०२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: