पिंपरी : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. येत्या दहा दिवसांत थकीत कर न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीचा 'बोजा' चढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. यापैकी पाच लाखांहून अधिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ७२५ कोटी रुपयांचा कर वसूल करायचा आहे.
विशेष म्हणजे, पाच लाखांहून अधिक रक्कम थकवलेल्या २,०२२ मोठ्या थकबाकीदारांकडे तब्बल २८०.६८ कोटी रुपयांचा कर बाकी आहे. या थकबाकीदारांना प्राधान्य देऊन कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी थकबाकीदारांना आवाहन केले आहे की, "येत्या दहा दिवसांत कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी." तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले की, "पाच लाखांहून अधिक रक्कम असलेल्या मालमत्तांवर प्राधान्याने कारवाई केली जाईल."
कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी स्पष्ट केले की, "थकबाकीदारांनी दहा दिवसांत कर न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा चढवला जाईल. त्यानंतर मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई केली जाईल."
महापालिकेने थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच, मालमत्तेसमोर स्पीकरद्वारे थकबाकीदारांची नावे पुकारून जनजागृती करण्यात येणार आहे.
या कठोर कारवाईमुळे शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकजण कर भरण्यासाठी धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: