पुणे : पुणे रेल्वे विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले सामान यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १,७१,४२० प्रकरणांमधून १०.७३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये केलेल्या तिकीट तपासणीत २०,५६९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून ८०,८१,८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याच महिन्यात अनियमितपणे आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या २,९८६ प्रवाशांकडून ११,५०,६०० रुपये, तर बुक न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या ३८७ प्रवाशांकडून ४९,५७५ रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री हेमंत कुमार बेहरा यांनी या मोहिमेचे समन्वयन केले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचित केले आहे की त्यांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि पैसे न भरल्यास तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. रेल्वे प्रशासन नियमितपणे तिकीट तपासणी करत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: