पुणे : पुण्यातील नानापेठेतील डोके तालिम परिसरात काल १ सप्टेंबर रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नानापेठ परिसरात एकच खळबळ उडाली असून, परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे.
रविवारी रात्री हल्ला घडण्याच्या काही वेळ आधी परिसरातील वीजपुरवठा अचानक बंद करण्यात आला. हल्लेखोर मोटारसायकलींवरून आले आणि त्यांनी वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने हल्ला करून ते घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतील आंदेकर यांना तातडीने नजिकच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हत्येमागे कौटुंबिक वाद आणि आर्थिक व्यवहारांचे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीचे पती गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, आणि तुषार आबा कदम यांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत.
आंदेकर कुटुंबाची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पुण्यात चांगलीच परिचित आहे. २०१७ साली वनराज आंदेकर पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील नगरसेवक पदाची जबाबदारी पार पाडली आहे.
वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीशी संबंधित आहे. त्यांना प्रमोद माळवदकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. आंदेकर टोळीचा पुण्यात गेली २५ वर्षे दबदबा आहे, आणि त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर यांनी त्यांच्या बहिणीचे पती, गणेश कोमकर यांना एक दुकान चालवण्यास दिले होते. मात्र, हे दुकान पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत पाडण्यात आले. ही कारवाई वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आली, असा कोमकर यांना संशय होता. या रागातून कोमकर यांनी वनराज आंदेकर यांची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: