पुणे : उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष आणि महिला स्वतंत्र इमारतीच्या पुनर्बांधणीचे तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय आणि मध्यवर्ती इमारत क्रमांक २ यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी पवार यांनी सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि टिकाऊ असावीत तसेच ती वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश दिले.
प्रमुख उपस्थिती:
या भूमिपूजन सोहळ्याला आमदार सुनील टिंगरे, महिला आणि बालविकास अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विकासकामांचा आढावा:
प्रादेशिक मनोरुग्णालयात २३,२२९ चौ.मी. क्षेत्रफळावर बांधण्यात येणाऱ्या या इमारतीत पुरुष आणि महिलांसाठी एकूण १५ कक्षांची योजना करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, कुटुंब कक्ष, परिचारिका कक्ष, शवगृह, तसेच आरोपींसाठी कक्षांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १३१.७४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, नवीन कक्षांचे बांधकाम बेंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि मज्जातंतू विज्ञान संस्थेच्या धर्तीवर होणार आहे.
मध्यवर्ती इमारत क्र. २ चे बांधकाम:
या १० मजली इमारतीचे एकूण क्षेत्रफळ २२,५०० चौ.मी. असून, हरित संकल्पनेवर आधारित इमारतीत २१८ चारचाकी आणि १,३०९ दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ९६.३८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या इमारतीमुळे पुणे शहरातील विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी येणार आहेत, ज्यामुळे भाड्यात बचत होण्यास मदत होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल.
जमाबंदी आयुक्त आणि भूमीलेख कार्यालय:
या कार्यालयाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १८,५०३ चौ.मी. आहे. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, जमाबंदी आयुक्तांचे निवासस्थान, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह यांचा समावेश आहे. यासाठी ७८.६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महिला आणि बालविकास भवन (अहिल्या भवन) आढावा:
भूमिपूजनापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसरातील प्रस्तावित महिला आणि बालविकास भवनाच्या कामांची माहिती घेतली. त्यांनी इमारतीसाठी वेगवेगळ्या वास्तुविशारदांकडून तीन-चार संकल्पचित्रे तयार करून, उत्तम दर्जाचे काम सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम संकल्पचित्राची निवड करण्याचे निर्देश दिले.
Reviewed by ANN news network
on
८/२६/२०२४ ०५:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: