चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करणार असल्याचे पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या वेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले, "पिंपरी-चिंचवड शहरात मी पूर्वीपासूनच सक्रिय आहे. अनेक जण पक्ष सोडून गेले असले तरी, आम्ही जनतेच्या पाठिंब्याची पाहणी करत आहोत." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शहराध्यक्ष पदाबाबतचा अंतिम निर्णय अजित पवार घेतील.
"पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा ऐतिहासिक बालेकिल्ला आहे. माझे लक्ष्य आमदार किंवा खासदार होणे नसून, पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे हे आहे," असे पार्थ पवार यांनी नमूद केले.
पिंपरी मतदारसंघाबाबत बोलताना पवार यांनी ठामपणे सांगितले की, "अण्णा बनसोडे हेच आमचे उमेदवार असतील." त्यांनी अजित गव्हाणे यांच्या निर्णयावर टीका करत म्हटले, "अजित गव्हाणे यांनी चुकीचा निर्णय घेतला असून, त्यांचा विजय अशक्यप्राय वाटतो."
या घोषणेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत कडवी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांत आपली रणनीती आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२४ ०५:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: