‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम!
पुणे : :वाहनांच्या हेडलाईटमधील प्रकाशकिरण कसे असावेत, याबाबत ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत ठरवलेली मानके आहेत. मात्र, काही वाहनचालक नियम डावलून त्यांच्या गाड्यांच्या हेडलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक असे प्रकाशकिरण बसवतात. या त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अनेक अपघात घडले आहेत, ज्यात काहींनी आपला जीवही गमावला आहे. या गंभीर समस्येवर ‘सुराज्य अभियान’ने आवाज उठवून राज्य परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत २३ ऑगस्ट रोजी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.
सुरक्षा मानकांची सुधारणा आणि तक्रारीची पार्श्वभूमी:
‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत केंद्र शासनाने २००५ मध्ये वाहनांच्या हेडलाईटसाठी सुरक्षा मानकांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या होत्या. हे नियम सुनिश्चित करताना वाहनचालकांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात या नियमांचे पालन न केल्यामुळे ‘सुराज्य अभियान’ने परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्यांना वाहनांच्या हेडलाईटची तपासणी करून नियमबाह्य बदल करणाऱ्या दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याविषयी जनजागृती करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रत्यक्षात कारवाईची मागणी:
मोटार वाहन कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्याची तरतूद असली तरी, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे आम्ही परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आदेश देऊन थांबण्यापेक्षा, या प्रकरणात खरोखरच कारवाई होत आहे का, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे राज्यातील अनेकांचे प्राण वाचू शकतात. जर या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही, तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: