अहमदनगर: अहमदनगरमध्ये अॅन्टीकरप्शन खात्याने एक तलाठी आणि महिला मंडल अधिकार्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सागर एकनाथ भापकर आणि मंडलाधिकारी शैलजा रामभाऊ देवकाते अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भापकर सावेडी येथे तलाठी असून शैलजा देवकाते या मंडलाधिकारी आहेत. त्यांच्यावर तोफखाना पोलीसठाण्यात ८३५/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी अॅन्टीकरप्शनकडे तक्रार केलेली व्यक्ती आणि तिचे नातेवाईक यांच्या नावे सावेडी येथे 18 हजार चौरस फूट जागेचा प्लॉट आहे. या प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिका यांचेकडून शासकीय रेखांकन करुन तेथे २२ प्लॉट तयार करण्यात आले आहेत. त्याच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी शैलजा देवकाते यांनी ४४ हजार रुपयांची लाच मागितली. तर, नोंदी अपलोड करण्यासाठी तलाठी सागर भापकर यांनी ११ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली. तक्रारदाराने याची तक्रार अॅन्टीकरप्शनच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडे केली. तेथील अधिकार्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तत्थ्य आढळले. त्यामुळे अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: