भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ' गाणी गदिमांची' या सुरेल कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमात ग.दि.माडगूळकर लिखित गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला . ही गीते शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर यांनी सादर केली. जयंत साने(हार्मोनियम), सुभाष देशपांडे (सिंथेसायझर ), मोहन पारसनिस (तबला ), हेमंत पोटफोडे(तालवाद्य ) यांनी साथसंगत केली.नीना भेडसगावकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.या कार्यक्रमातून ग.दि. माडगूळकर यांच्या प्रतिभाशाली गीतांना आणि आठवणींना उजाळा दिला गेला ,त्यात उपस्थित रंगून गेले.
हा कार्यक्रम रविवार, दि. ९ जून २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला .हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २११ वा कार्यक्रम होता .भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.
'प्रभात समयो पातला,कौसल्येचा राम,विकत घेतला शाम,खेड्यामधले घर कौलारू, नाच रे मोरा, घननीळा, लपविलास तू , त्या तिथे पलीकडे, या कातरवेळी, नविन आज चंद्रमा, जिवलगा कधी रे येशील तू 'अशा एकाहून एक गीतांची जणू बरसातच झाली.
'जाळीमंदी पिकली करवंद,घन घन माला,फड सांभाळ , बुगडी माझी सांडली गं' या गीतांनाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
गीत रामायणातील 'स्वयेश्री रामप्रभू, राम जन्मला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे, तोडिता फुले, सेतू बांधा रे' या गीतांनी रसिक स्मरणरंजनात हरवून गेले. ' वंदे मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम' ने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: