पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेची कामगिरी
पिंपरी : नागरिकांना ऑनलाईन टास्क देण्याच्या आमिषाने आर्थिक गंडा घालणार्या एका टोळीतील ८ जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या टोळीचे २ सूत्रधार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या टोळीने आजवर अनेक नागरिकांना गंडा घातला असून हा फसवणुकीचा आकडा २० कोटी रुपयांवर असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
देश आणि जागतिक पातळीवर गाजलेल्या महादेव बुक अॅप प्रकरणात ज्या प्रमाणे गरजू व्यक्तींची खाती पैसे वळविण्यासाठी वापरण्यात आली तशीच मोडस ऑपरेंडी वापरली आहे.
अल्ताफ मेहबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्ण भगवान खेडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून या टोळीचे सूत्रधार किरण खेडेकर आणि हाफिज शेख हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
ही टोळी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम सारख्यासोशल मीडियावर ऑनलाईन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष गरजूंना दाखवत असे. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे दाखवून पैसे उकळले जात असत. त्यांना मोबदला अथवा त्यांनी दिलेले पैसे परत मिळत नसत. त्यावेळी आपले फसवणूक झाली हे त्या गरजूंच्या लक्षात येत असे.
या प्रकरणात पोलीस आपणापर्यंत सहजासहजी पोहोचू नयेत म्हणून आरोपींनी महादेव बुक अॅप घोटाळ्याप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब केला होता. त्यांनी अनेक गरीब, गरजू नागरिकांची खाती त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन उघडली. या खात्यावर उलाढाल करू देण्यासाठी त्यांना दरमहा पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्याप्रमाणे ते या खातेधारकांना दरमहा २ ते ५ हजार रुपये देत होते.
पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यात आणखीही काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: