हुतात्मा कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (VIDEO)

 


पुणे: हुतात्मा  कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून हुतात्मा  जवानास मानवंदना दिली.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहीद कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भारतीय सैन्याच्यावतीने दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. हुतात्मा  कर्नल वैभव काळे  यांचा  मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी वैभव काळे यांची आई रचना काळे, पत्नी अमृता काळे, भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आणि सासरे कर्नल विवेक खैरे (नि.) उपस्थित होते. 

 माजी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल नोबेल थंबुराज (नि.), सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (नि.), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (नि.), उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे(नि.), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकही शाहिद काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

सियाचीन ग्लेशियर, कारगीलजवळील द्रास, संयुक्त राष्ट्र शांतिसेनेत काँगो, ईशान्य भारत येथील सेवांसह पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्यावेळी तुकडीचे नेतृत्त्व केलेले कर्नल (निवृत्त) वैभव अनिल काळे (वय ४६) यांना संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक म्हणून गाझामध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आले. 

कर्नल काळे २००० मध्ये 'एनडीए' आणि त्यानंतर 'आयएमए' मार्फत लष्कराच्या पायदळात रुजू झाले. ११ जम्मू-काश्मीर रायफल्स या तुकडींतर्गत त्यांनी याआधी विविध आघाड्यांवर सेवा दिली. याच तुकडीचे त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून नेतृत्वही केले होते. २०२२ मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 

त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत 'यूएनडीएसएस'मध्ये सेवा सुरू केली. त्यांचे पहिलेच पोस्टिंग गाझा पट्टीत राफा येथे होते. 'हमास' विरुद्धच्या युद्धात इस्रायलकडून राफावर भीषण बॉम्बवर्षाव व गोळीबार सुरू होता. तिथेच गेल्या महिन्यात १२ एप्रिलला वैभव काळे यूएन निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. सोमवारी त्यांना वीरमरण आले.

हुतात्मा कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (VIDEO) हुतात्मा कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (VIDEO) Reviewed by ANN news network on ५/१८/२०२४ ०२:०५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".