आषाढीवारीसाठी नियोजन बैठक

 

पिंपरी :  दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीमध्ये आषाढीवारीचे आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार असून इतर आस्थापनांसोबत समन्वय साधून उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तसेच सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि आराखडा तयार करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही दिल्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी  पालखी सोहळा सन २०२४ च्या अनुषंगाने महापालिकेच्या  वतीने  वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या  विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या विशेष उपस्थितीत दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर आढावा बैठकीचे आयोजन महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आले होते, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.


         या बैठकीस महापालिका आणि पोलीस अधिकार्‍यांसह महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव आप्पा बागल, आळंदी तसेच देहू संस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम मोरे, स्वाती मुळे, बाळकृष्ण मोरे, श्रीकांत लावंडे, संजय मोरे, विष्णू मोरे, विठ्ठल मंदिर आकुर्डीचे विश्वस्त माजी नगरसेवक गोपाळ कुटे, गुलाब कुटे, माणिक मोरे, माऊली आढाव, राजू ढोरे, तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, अन्न औषध प्रशासन या विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          बैठकीत  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये  रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी, पालखी  मार्गामधील लटकलेल्या वीजेच्या तारा हटविण्यात याव्यात, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, मोकाट जनावरे तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरूस्ती करावी,  स्नान पाण्याचे नियोजन करावे, विसाव्यासाठी खासगी शाळा आणि मंगल कार्यालये खुली करावीत, वारकऱ्यांच्या अभंगांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून इतर स्पीकर आवाज कमी ठेवा किंवा बंद ठेवावा, हरीतवारीसारखे आणखी उपक्रम राबवावेत, जास्तीत जास्त देशी झाडांच्या बियांचे आणि रोपांचे वाटप करावे, या कार्यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवावा इ. सुचनांचा समावेश होता.

आषाढीवारी २०२४ च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच ही वारी पर्यावरणपूरक,प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सैन्यदलासोबत मिळून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून २ लाखांपेक्षा जास्त देशी रोपांचे तसेच बाबूंच्या रोपांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

          पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येईल आणि सुरक्षेच्या बाबतीत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

         दोन्ही पालखीच्या प्रस्थानांच्या अनुषंगाने वाहतूकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे वाहतूक पोलीस विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी पालखी दरम्यान योग्य ती दक्षता व व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.

उपस्थितांचे आभार संतपीठाच्या संचालिक डॉ. स्वाती मुळे यांनी मानले.

आषाढीवारीसाठी नियोजन बैठक आषाढीवारीसाठी नियोजन बैठक Reviewed by ANN news network on ५/२६/२०२४ १०:३८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".