केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जालन्याच्या सभेत टीका
जालना : ज्यांच्याकडे नेता नाही, नियत नाही आणि धोरणही नाही अशा इंडी आघाडीचे नेते पंतप्रधानपदही आळीपाळीने वाटून घेण्याच्या वाटाघाटी करत आहेत. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख मांडणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे दूरदर्शी नेतृत्व नरेंद्र मोदी या दोघांमधून नेता निवड करणारी देशाची जनता नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी व्यक्त केला. जालना मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी- महायुतीचे उमेदवार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड जाहीर सभेत श्री.शाह बोलत होते. यावेळी इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत श्री.शाह यांनी विरोधकांच्या तुष्टीकरण धोरणाचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा.अजित गोपछडे, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, आ.नारायण कुचे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.शाह यांनी या सभेत मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य सज्ज आहे, आणि पुढच्या पाच वर्षे देश कोणाच्या हाती राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणाऱ्या नेत्यांची इंडी आघाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही कलंक नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे, असे श्री.शाह म्हणाले. झारखंड मध्ये इंडी आघाडीच्या एका मंत्र्याच्या पीए कडून 30 कोटींची रोकड पकडली गेली, पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याकडून 50 कोटी जप्त केले गेले होते. एका मंत्र्याकडे साडेतीनशे कोटींचे घबाड सापडले, गेल्या दहा वर्षांत 12 लाख कोटींचे घोटाळे करणारी इंडी आघाडी आहे, तर दुसरीकडे 23 वर्षांपासून मुख्यमंत्री, पंतप्रधान असूनही, ज्यांच्या विरोधात एकही आरोप नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे थोडासा उन्हाळा वाढताच बँकॉकला पळणारे राहुल गांधी आहेत, तर 23 वर्षांत एकही सुट्टी न घेता अखंडपणे देशसेवा करणारे पंतप्रधान मोदी आहेत. या दोघांतून आपल्याला नेता निवडायचा आहे, असे ते म्हणाले.
रावसाहेब दानवे यांना दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित बनविले, समृद्ध बनविले, देशाची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हायला हवे होते, पण काँग्रेस आणि इंडी आघाडीने वर्षानुवर्षे राम मंदिरात अडथळे आणले, मोदी सरकारने पाच वर्षांतच राम मंदिराची न्यायालयीन लढाई जिंकली, मंदिर बांधले, आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या समारंभाचे निमंत्रणही या आघाडीच्या नेत्यांनी झिडकारले, आणि सोहळ्यावर बहिष्कार घातला. या सोहळ्यास हजेरी लावली तर व्होट बँक नाराज होईल, याची त्यांना भीती होती. आम्हाला त्या व्होट बँकेची भीती वाटत नाही. आमच्या सरकारने मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काश्मीरमधील 370 कलम रद्द करून मोदी यांनी काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकही काश्मीरसाठी प्राण देण्यासाठी सज्ज आहे, याची काँग्रेसच्या नेत्यांना कल्पना नाही अशी खिल्लीदेखील त्यांनी उडविली. काँग्रेस आणि इंडी आघाडीवाले कलम 370 ला वर्षानुवर्षे कवटाळून बसले होते. मोदी सरकारने नक्षलवाद, दहशतवाद नष्ट करून देशाला सुरक्षित बनविले. 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणून त्यांची जीवनशैली उंचावण्याचे काम मोदी सरकारने केले. इंदिरा गांधीपासून काँग्रेस केवळ गरीबी हटविण्याच्या घोषणाच करत होते. मोदी सरकारने घराघरांत गॅस दिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले, कोविड काळात लस निर्माण करून मोदी सरकारने 130 कोटी लोकसंख्येला सुरक्षित केले. त्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांचे साथीदार कोविड रुग्णांच्या खिचडीची मलई ओरपत होते, असा आरोप श्री.शाह यांनी केला.
जालन्याचे स्टील देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात जाणार असून जालन्याचा डंका जगात वाजणार आहे. हे काम मोदी सरकारने केले. औरंगाबादचे नामांतर करण्याचे काम मोदी सरकारने केले. ज्यांनी संभाजीनगर नावास विरोध केला, त्या काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंना तुम्ही याचा जाब विचारला पाहिजे, कारण त्यांनी या प्रस्तावाचे स्वागतही केले नाही, असेही श्री.शाह म्हणाले. राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक, याबाबत उद्धव ठाकरेंना जनतेने सवाल केले पाहिजेत. ते यावर बोलणार नाहीत, कारण ते काँग्रेस, शऱद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्धव ठाकरेंनी पदाच्या लालसेने या लोकांसोबत जाणे पसंत केले. अलीकडे पाकिस्तान सतत राहुल गांधींचे समर्थन करत आहे. मोदी सर्जिकल स्ट्राईक करतात, तेव्हा राहुल गांधी प्रश्न उपस्थित करतात, मोदी जेव्हा जेव्हा देशहिताचे निर्णय घेतात, तेव्हा राहुल गांधी सवाल उपस्थित करतात, पाकिस्तानचा अजेंडा चालविणारे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आले, तर राम मंदिरावरही बाबरी नावाचे कुलूप लावण्याचे पाप काँग्रेस व इंडीचे नेते करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
इंडी आघाडीचा विजय झालाच, तर त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरादेखील नाही, अशी टीका करत, राहुलबाबांना पंतप्रधान बनवावे का, असा सवालही त्यांनी जनतेला उद्देशून केला, तेव्हा श्रोत्यांनी एकमुखाने नकाराच्या घोषणा दिल्या. इंडीकडे नेता नाही, नियत नाही, आणि कोणतेही धोरणदेखील नाही, अशी टीका त्यांनी केली. मोदीजींकडे गेल्या दहा वर्षांच्या कामाचा हिशेब आहे, आणि पुढच्या 25 वर्षांच्या कामाची आखणीदेखील आहे. मोदीजींना पंतप्रधान बनविणे म्हणजे, पाकिस्तानला मुहतोड जबाब देणे, देशातील कोट्यवधी युवकांना जगासोबत जोडणे, देशाला जगात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून देणे आहे, असेही ते म्हणाले.
दहा वर्षे सरकार असलेल्या इंडी आघाडीने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, 1.9 लाख कोटी दिले, तर मोदीजींनी 10 लाख कोटी दिले. महाराष्ट्रात भारताला पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने बजावली आहे, केवळ नरेंद्र मोदी हेच देशाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतील, अशी ग्वाही देत, रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा विजयी करण्याचे आवाहन श्री.शाह यांनी केले. दानवेंना विजयी करा, जालन्याला सर्व क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी करतील, असा विश्वासही श्री.शाह यांनी भाषणाच्या अखेरीस व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:२८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: