पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने ८५ वर्षे वयावरील मतदारांसह दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील एकूण ३११ मतदारांसाठी गृहमतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा कार्यक्षेत्रात गृहमतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.ो
मावळ लोकसभा मतदारसंघात गृहमतदानासाठी पात्र ठरलेल्या एकूण मतदारांमध्ये ८५ वर्षे वयावरील २६३ मतदार, शारीरिकदृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले ४५ मतदार तर अत्यावश्यक सेवेतील ३ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील ४१ मतदार तसेच १६ दिव्यांग मतदार अशा एकूण ५७ मतदारांचा समावेश आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील ५९ मतदार आणि ११ दिव्यांग मतदारांसह अत्यावश्यक सेवेतील ३ मतदार असे एकूण ७३ मतदार गृहमतदानासाठी प्रक्रिया राबविली जाईल. उरण विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील ५८ मतदार तसेच १० दिव्यांग मतदार असे एकूण ६८ मतदार असून मावळ विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील २४ मतदार तर १ दिव्यांग मतदार अशा एकूण २५ मतदारांचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील ५२ मतदार आणि २ दिव्यांग अशा एकूण ५४ मतदारांचा समावेश आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयावरील २९ मतदार, ५ दिव्यांग मतदार अशा एकूण ३४ मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
गृहमतदानासाठी बुथ स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करून इच्छुक मतदारांकडून १२ ड अर्ज भरण्यात आले होते. या अर्जांची छाननी करून दिव्यांगांसह ८५ वर्षे वयावरील पात्र मतदारांसाठी टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यानंतर गृहमतदान प्रक्रिया राबविण्यासाठी या मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याकरिता स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये सेक्टर ऑफिसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, बीएलओ, व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. या गृहमतदानासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले असून त्यानुसार पथकातील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे विहीत कालावधीत ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. तसेच गृहमतदानाबाबतची पुर्वकल्पना संबधित मतदार यांना लेखी स्वरूपात देण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे गृहमतदान प्रक्रियेवेळी काटेकोरपणे पालन करून प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२४ ०९:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: