मुंबई : नगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 153 A आणि 506 नुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स तर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टी विधी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. अखिलेश चौबे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अशीच तक्रार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे व नागपूर पोलिसांकडे केली आहे. ॲड.चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अहमदनगर येथे झालेल्या सभेत खा. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू असे वक्तव्य केले आहे. ''औरंगजेबाला मराठ्यांनी इथं गाडलं आणि दफन केलं तसंच तुमच्या बाबतीतही घडेल'' असे वक्तव्य खा. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करीत केले आहे. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत खा. राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी असून यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. औरंगजेबासारख्या परकीय आक्रमकाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही ॲड. चौबे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या वक्तव्याबद्दल राऊत यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 153 A आणि 506 नुसार कारवाई करावी, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
अमरावती येथे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांच्या वतीने ॲड.मनोज जैस्वाल यांनी, प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तर प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अशाच पद्धतीची तक्रार केली आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२४ ०८:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: