सत्तारांचे कार्यकर्ते गेल्या विधानसभेचा वचपा लोकसभेला काढणार, दानवे-सत्तार एकत्र, कार्यकर्ते जुळवून घेईनात!...
दिलीप शिंदे
सोयगाव : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात गेल्या चाळीस वर्षांपासून खुर्ची साठी मैत्री आहे हे सर्वश्रुत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदेगट), रासप,आरपीआय (आठवले) व घटक पक्ष मिळून महायुती तयार झाली आहे. महायुतीत जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आला असून भाजपने जालना लोकसभेसाठी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत थोड्याशा फरकाने पराभूत झालेले डॉ.कल्याण काळे यांना महाविकास आघाडीने दानवेंच्या विरोधात मैदानात उतरविले असून मंगेश साबळे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉ.कल्याण काळे यांच्या उमेदवारी मुळे मतदार संघात कधी न चमकलेले रावसाहेब दानवे यांना मतदारसंघात फिरावे लागते आहे.यातच मतदार राजाच्या उद्रेकाला समोर जावे लागत असल्याने दानवे यांची दमछाक होत आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजप युती होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हेच जालना लोकसभेसाठी उमेदवार होते. सत्तार व दानवे यांची मैत्री असल्याने लोकसभेसाठी सत्तार हे दानवेना मदत करायचे व सिल्लोड-सोयगाव विधानसभेसाठी सत्तार यांना दानवे मदत करीत असत. १९९५ व १९९९ या दोन टर्म आमदार असलेले किसनराव काळे यांचे २००४ मध्ये तिकीट कापून सांडू पाटील लोखंडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. विद्यमान आमदार किसनराव काळे यांचे भाजपने तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी केल्याने दानवेंची खेळी यशस्वी झाली होती. मतविभागणीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना होणार असल्याचा अंदाज दानवेना होता. मात्र सांडू पाटील लोखंडे यांची साधी राहणी मतदारांना भावली २००४ साली झालेल्या तिरंगी लढतीत सांडू पाटील लोखंडे हे ३०१ मतांनी विजयी झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दानवेंनी खेळी करीत विद्यमान आमदार सांडू पाटील लोखंडे यांचे तिकीट कापले व सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली. येथून सत्तारांचा राजकीय प्रवास सुखद झाला. दानवेंच्या आतील खेळीने सत्तार विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली. बनकरांचा दुसऱ्यांदा पराभव झाला.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ हा भाजपचा गड ढासळला
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सत्तार यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध होत असल्याचे पाहून दानवेंनी खेळी करीत भाजपचा गड असलेला मतदारसंघ हा स्वतःच्या स्वार्थासाठी युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला सोडला.सिल्लोड-सोयगाव विधानसभेची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर कट्टर शिवसैनिकांनी जल्लोष केला होता. शिवसैनिकाला आता आपले पक्षाचे धनुष्यबानाचे बटण दाबण्याची संधी मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कोणतीही अपेक्षा न बाळगता शिवसेनेने भाजपचा मनापासून प्रचार केला होता. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत रातोरात मातोश्री गाठीत शिवसेनेत प्रवेश करून सिल्लोड-सोयगाव विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. शिवसेनेकडून सत्तारांना जाहीर झालेली उमेदवारी भाजप कार्यकर्त्यांच्या पचणी पडले नाही.युती धर्म न पाळता सत्तारांचे समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत सत्तारांच्या विरोधात उतरविले. विधानसभेच्या निवडणुकीत वरीष्ठ नेत्यांनी सत्तारांचा प्रचार केला मात्र स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते हे सत्तारांच्या प्रचारात फिरकलेच नाही.त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा प्रचार केला. सिल्लोड-सोयगाव विधानसभेची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर मातोश्रीच्या आदेशाचे पालन करीत कट्टर शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेत सत्तार यांना विजयी केले. भाजपच्या या खेळीमुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात चर्चेला उधाण आले होते.आता दानवेंची वेळ आहे. जालना लोकसभा मतदारसंघात सत्तारांचा बऱ्यापैकी दबदबा आहे. सत्तारांकडून कार्यकर्त्यांना दानवेंचा प्रचार करण्याचा आदेश असताना देखील कार्यकर्ते मात्र मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत दानवेंचा पराभव झालाच पाहिजे असे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंची विकेट पडणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात मतदारांमध्ये सुरू आहे. यात भर पडली ती शेतकरी, बेरोजगारी, मतदारसंघाकडे केलेले दुर्लक्ष, नाराज भाजप कार्यकर्ते यांचा फटका दानवे यांना बसणार असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांचा मात्र फायदा होणार असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे.१३ तारखेला मतदान होणार आहे. निकालानंतर सत्तार व दानवे या दोघांच्या मैत्री संपुष्टात येणार असे मतदार ठिकठिकाणी चर्चा करतांना दिसून येत आहे.
सत्तारांचे कार्यकर्ते गेल्या विधानसभेचा वचपा लोकसभेला काढणार, दानवे-सत्तार एकत्र, कार्यकर्ते जुळवून घेईनात!...
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२४ १०:१६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२४ १०:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: