दिलीप शिंदे
सोयगाव : तालुक्यातील बनोटी परिसरातील शेतीमध्ये विहिरीचे खोदकाम करीत असताना आकर्षक चकाकणारे दगड मिळाले आहेत. दलालांमार्फत या दगडांची गुपचूप विक्री केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे. गौण खनिजाचा साठा ही शासनाची मालमत्ता असून, या प्रकरणी दि.४ शनिवारी रात्री उशीरा पोलीस प्रशासनाने रितसर पंचनामा करीत विहीरीच्या कामास प्रतिबंध केला आहे .
बनोटी येथील रविंद्र शिवाजी शिंदे यांच्या गट क्रमांक १६९ मध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. साधारण पन्नास फुटांपर्यंत विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर खोदकामामध्ये पिवळसर बदामी रंग असलेले पाणीदार दगड आढळून आले. परंतु संबंधित शेतकऱ्यास हा कोणत्या प्रकारचा दगड आहे, याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही घटना नजरेआड केली. परंतु अजिंठा परिसरात काम करणाऱ्यांना याची माहिती मिळताच या विहिरीवर गर्दी वाढू लागली. मिळालेल्या चकाकणाऱ्या मौल्यवान दगडांची खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली. याची माहिती महसूल व सोयगाव पोलिसांकडे गेल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बडे, सहायक पोलीस निरीक्षक रज्जाक शेख, श्रीकांत पाटील यांनी विहीरीची पहाणी करीत मौल्यवान दगडांचा पंचनामा केला असुन पुढील कार्यवाहीसाठी महसुल प्रशासनाकडे पाठविला आहे.
अजिंठा येथील तरुण मोठ्या प्रमाणात मौल्यवान दगड, गारगोटीच्या शिल्पांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. यावर त्यांची उपजीविका सुरू आहे. मात्र विहिरीमध्ये आढळून आलेल्या चकाकणारे दगडांची चोरटी विक्री करण्याचा गोरखधंदा जर दलालांमार्फत होत असेल तर त्यास आळा घालणे आवश्यक आहे. चकाकणारे दगडांची किती विक्री झाली आहे याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही. महसूल विभाग व पोलीस प्रशासन काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विहीर खोदकाम करताना आढळले चकाकणारे दगड, पोलिसांनी केला पंचनामा...
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ०९:३२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ०९:३२:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: