३२ जण लढवणार शिरूर लोकसभा निवडणूक

 


शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे  : भारत निवडणूक आयोगाच्या  निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी ३२  उमेदवार निवडणूक रिंगणात  आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे आदी उपस्थित होते. चिन्ह वाटपानंतर श्री. मोरे यांनी  उमेदवारांना निवडणूक नियमांची माहिती दिली.  निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांना ९५ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये.  नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून  खर्च गणना केली जाईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे.

प्रचार कालवधीमध्ये केवळ रुपये १० हजारापर्यंतचा खर्च रोखीने करता येईल, १० हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करता येईल,  निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच  व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशा सूचना श्री.मोरे यांनी केल्या. 

उमेदवारांसाठी निवडणूक प्रचाराची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतची असेल. दोन धर्मात समाजात तेढ निमार्ण होईल असा प्रचार करू नका किंवा देव देवतांचा, धार्मिक चिन्हाचा प्रचारात वापर करू नये. मतदानापूर्वी ४८ तास प्रचार थांबविण्यात यावा. आचार संहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास  निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करावी. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आवशक आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मॉक पोल घेतले जाईल. 

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर उमेदवारांनी त्यांचा बुथ लावणे आवश्यक आहे. बुथ लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेकडून उमेदवारांनी परवानगी घ्यावी, अशा सूचना देवून  लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री.मोरे यांनी केले.

३२ जण लढवणार शिरूर लोकसभा निवडणूक ३२ जण लढवणार शिरूर लोकसभा निवडणूक Reviewed by ANN news network on ४/२९/२०२४ ०८:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".