रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे नामनिर्देशन पत्रासोबत आवश्यक असणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर आवश्यक बाबी
नामनिर्देशनपत्र 12 एप्रिल ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी 46-- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालय, जिल्हाधिकारी यांचे दालन, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय नवीन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभाजवळ, तालुका व जिल्हा रत्नागिरी, 415612 येथे स्वीकारण्यात येतील, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही.
उमेदवार किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशन पत्र दाखल करणे आवश्यक आहे. दोन पेक्षा जास्त लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. एका लोकसभा मतदारसंघात चार पेक्षा जास्त नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. उमेदवार निवडणूक लढवित असणा-या लोकसभा मतदारसंघा व्यतिरिक्त, इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे बंधनकारक आहे.
उमेदवाराचे स्वतः चे छायाचित्र
नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील नमूद जागी 2 से.मी. x 2.5 से.मी. आकाराचे अलीकडील काळातील निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे असलेले छायाचित्र चिकटवावे. छायाचित्र पांढ-या किंवा फिकट पांढ-या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पूर्ण चेहरेपट्टी असलेले स्टॅम्प साईज 2 से.मी. x 2.5 से.मी. आकाराचे अलीकडचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराची पाच छायाचित्रे स्वतंत्र दाखल करावीत. (मागील लगतच्या तीन महिन्यातील छायाचित्र असावीत.) तसेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रावर तसेच इतर जागेवर वेगळ्याने छायाचित्र चिटकवावे. छायाचित्रावर पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
छायाचित्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदावारासहित एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल. (उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल. त्यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.)
नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेले प्रस्तावक
उमेदवार 46 - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याने याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास एक मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक आहे. अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 10 मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक आहे. प्रस्तावक अशिक्षित असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिका-यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील.
शपथपत्र
Revised Form-26 मधील शपथपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांच्यासमोर केलेले असणे बंधनकारक आहे. शपथपत्रावरील प्रत्येक पानावर उमेदवार यांची सही व नोटरी पांचा शिक्का असणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत विहीत नमुन्यातील शपथपत्र सादर करणे बंधनकारक राहील. शपथपत्र हे 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक आहे. शपथपत्रातील सर्व माहिती/रकाने पूर्णपणे भरलेली असणे बंधनकारक आहे. शपथपत्रातील माहिती टिक/डॕश केलेली ग्राह्य धरली जाणार नसून, त्यामध्ये “NIL (निरंक) or "Not Applicable" (लागू नाही) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.
ना देय प्रमाणपत्र
उमेदवारांनी मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासनाने दिलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतलेला असल्यास, शासकीय निवासस्थानासाठी भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी, दूरध्वनी आकार यांच्या संबंधातील संबंधित एजन्सीकडून घेतलेले "ना देय प्रमाणपत्र सादर करावे.
राजकीय पक्षाच्या उमेदवाराने दाखल करावयाचे फॉर्म
राजकीय पक्षाच्या उमेदवाराने Form A & B यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिल 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करणे बंधकारक आहे.
अनामत रक्कम
अनामत रक्कम 25 हजार रुपये व उमेदवार हा S.C./S.T प्रवर्गातील असल्यास 12 हजार 500 रुपये (तथापि जात प्रमाणपत्राची छायांकीत प्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.) ही रक्कम शासकीय कोषागारात खालील लेखाशिर्षाखाली चलनाने भरावी व भरलेल्या चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
लेखाशीर्ष-
8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTION-2-DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT अनामत रक्कम रोख स्वरुपातही स्वीकारली जाईल.
बँक खाते
या निवडणुकीसाठीचे स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणूक व्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार असू नयेत. उमेदवाराने स्वतःच्या नावे किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या सोबतचे संयुक्त बँक खाते केवळ या लोकसभा निवडणूक कामासाठीच काढलेले असणे बंधनकारक आहे. इतर कोणतेही संयुक्त बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. हे बँक खाते नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी .
प्रतिज्ञा (Oath)
नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी उमेदवाराने जर शपथ ही Stipendiary presidency magistrate, Stipendiary presidency magistrate of the first class, District judge and a person belonging to the judicial services of a state other than district judges as the officer यांच्या समक्ष घेतली असल्यास, शपथ घेतल्याबाबतचे संबंधित सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
इतर बाबी
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येताना तीन पेक्षा जास्त वाहने 100 मीटर परिसराच्या आत आणता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्र दाखल करते समयी आणण्यात येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात धरणे बंधनकारक राहील. अर्जदाराच्या तसेच अर्जदाराने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीच्या सहीचा नमुना नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: