पुणे : पुण्यातील कसबा पेठेत असलेल्या पुण्येश्वर मंदिरानजिक असलेल्या छोटा शेख सल्ला दर्गा बेकायदा बांधकाम कारवाई अंतर्गत पाडला जाणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर पसरविण्यात आली. त्यामुळे दर्गा परिसरात सुमारे ४ ते ५ हजार जणांचा जमाव जमला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी हजर होत जमावाला शांत केले. आता ही अफवा सोशल मीडियावर पसरविणार्या सुमारे बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
ही अफवा पसरल्यानंतर परिसरात जमाव जमताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
शनिवारी या प्रकरणी पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत दर्ग्याच्या ट्रस्टींनी दर्गा परिसरात झालेले बेकायदा बांधकाम स्वतःहून काढून घेण्याचे मान्य केले.
भाजपचे प्रवक्ता अली दारुवाला यांनी व्हिडिओ संदेशातून वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणली आणि कोणीही अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.
पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या जागरुकतेमुळे शहरातील सार्वजनिक शांतताभंग होणे टळले. ही अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या बाराशे जणांना आता कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ १२:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: