काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

 


मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार आहेत, असे सूचक भाष्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावेळी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, ग्रामिण विकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती. स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी उपस्थित होते. श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, काँग्रेसने आदिवासी समाज आणि मागासवर्गीयांची नेहमीच फसवणूक केली. या समाजातील नेत्यांना हे लक्षात आल्याने हे नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी श्री. वळवी यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अनुभव व ज्येष्ठता लक्षात घेऊन संघटनेत त्यांचा सन्मान राखला जाईल, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये असतानाच वळवी यांच्यासारखा निष्ठावंत नेता, माजी मंत्री काँग्रेसला सोडचिठ्ठी देतो यावरून या पक्षाची दारूण अवस्था लक्षात येते. राहुल गांधींच्या यात्रेचा समारोप होईपर्यंत राज्यातील अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असेही ते म्हणाले.

श्री.वळवी यांनी सांगितले की, आपण काँग्रेसचे आजवर निष्ठेने काम केले. मोदी सरकारकडून होणार्‍या विकासकामांमुळे प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपा संघटनेचे काम आपण निष्ठापूर्वक करू.श्री. वळवी हे 1999 ते 2014 या काळात तळोदा व शहादा  मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. 2009 ते 2014 या काळात श्री. वळवी हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते.

यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायक देशमुख, जालना जिल्ह्यातील मनसे नेते ज्ञानेश्‍वर(माऊली) गायकवाड, प्रदेश काँग्रेस सचिव अर्चना राठोड, जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोज सोनावणे, नंदुरबार पंचायत समितीचे माजी सदस्य लगन पावरा, महेंद्र बागुल, प्रदेश आदिवासी काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. रोशन गावित यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.


काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश Reviewed by ANN news network on ३/१३/२०२४ ०१:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".